सुलभ एकात्म मानव दर्शन – 01 - विनय पत्राळे



(सध्या केंद्र सरकारतर्फे पं. दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी वर्ष चालू आहे. श्री.विनय सोमण यांचा  दीनदयाळजींचा थोडक्यात परिचय करून देणारा लेख आपण दोन आठवड्यापूर्वी ब्लॉगवर प्रकाशित केला आहे. दीनदयाळजी मांडलेले भारतीय चिंतनावर आधारित एकात्म मानव दर्शन हे राष्ट्रीय तत्त्वज्ञानही सोप्या भाषेत यावे असा विचार होऊन श्री. विनय पत्राळे यांच्या एकात्म मानव दर्शन या पुस्तकावर आधारित हे सुलभ एकात्म मानव दर्शन संक्षेपाने क्रमशः प्रकाशित करीत आहोत. – समन्वयक)

 प्रस्तावना
आपला भारत देश जगातील सर्वात प्राचीन राष्ट्र आहे. ऐहिक व पारलौकिक अशा दोन्ही आयामात आपल्या  पूर्वजांनी समृद्धि प्राप्त केली होती. एकीकडे प्राणीमात्र - वनस्पतिसृष्टमधे एकत्वाची अनुभूत करतानाच दुसरीकड़े कला, साहित्य, विज्ञान, व्यापार या ऐहिक बाबींचा सुद्धा उत्कर्ष साधला होता. विश्वभरातील विद्यार्थी नालंदा व तक्षशिला या प्राचीन भारतीय विद्यापीठांमध्ये शिक्षण प्राप्त करण्यासाठी येत असत. भारताने जगाला शून्याची देणगी दिली. इथली संस्कृत भाषा, योग, आयुर्वेद, नृत्य परंपरा, उत्सव इत्यादि, इथली परिवार व्यवस्था या सर्व गोष्टी जीवनांकड़े पाहण्याची एक सकारात्मक दृष्ट देतात. स्वामी विवेकानंदांच्या शब्दात सांगावयाचे झाले तर मोक्ष प्राप्तीसाठी प्रयत्न करणा-या प्रत्येक आत्म्याला ले अंतिम आश्रयस्थान जेथे करण्यासाठी यावेच लागेल अशी आत्मसंशोधनाची व अध्यात्माची भूमी म्हणजे आपला भारत देश!’

कालक्रमामध्ये जसे व्यक्तीच्या जीवनात चढाव-उतार येत असतात तसेच ते राष्ट्रीय जीवनात सुद्धा येतात. ग्रीक, हुण, शक, कुशाण यांच्यासारख्या आक्रमक शत्रूंना पराजित करून त्यांना येथील समाजजीवनात पचवून टाकण्याचा पुरुषार्थ करणारा आपला समाज त्यानंतर झालेल्या इस्लामच्या आक्रमणाने पार खिळखळा झाला. स्पेन, पुर्तगाल, फ्रांस यांनी भारतात त्याच्या वसाहती स्थापन केल्या. इंग्रजांची गुलामगिरी दीडशे वर्षे चालली. दीर्घकाळपर्यंत येथील राष्ट्रजीवन आत्मग्लानीच्या कालखंडातून  चालले होते.

1947 मधे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुढे प्रगती व विकासाची कोणती दिशा असावी याबाबतीत फारसा सखोल विचार झाला नाहीं. ज्यांनी आपल्यावर राज्य केले त्यांची आंधळी नक्कल करण्याची स्पर्धा सुरु झाली. आपल्या स्वतःच्या अस्मितेचा व गौरवाचा विसर पडल्यामुळे जगात अन्यत्र चालणारे मतप्रवाह पर्याय म्हणून विचारार्थ पुढे आले. आपली स्वतःची जीवनदृष्टि, त्या आधारित दीर्घकाळपर्यंत टिकून राहिलेले आपले राष्ट्रजीवन वगैर बाबींचा अभ्यास न करता स्व-विरहित विकासनीतीचा अवलंब करण्यात आला.

स्वामी विवेकानंदांना जेव्हा पाश्चिमात्य विद्वान म्हणाले की तुमचे आध्यात्मिक ज्ञान तुम्ही आम्हाला द्या व त्याच्या बदलात आमचे समाजवादा सारखे आधुनिक विचार स्वीकारा तेव्हा स्वामीनी त्यांना उत्तर दिले की अहो! तुमच्या विचारांवर आधारित समाजरचना करून तुम्ही ती 500  वर्षांपर्यंत तर चालवून दाखवा... मग बघू!”

पाचशे वर्षे दूर राहिली, 50 वर्षांमधेच कम्युनिस्ट विचारांचा पाया ढासळला. रशियाची शकलं झालीत.... चीनने कम्युनिझमशी नाते तोड़ले....

इकबालने लिहिलेल्या सारे जहां से अच्छा या गीतामध्ये एक ओळ अशी आहे कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी. ही कुछ बात काय आहे ते शोधण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यानंतर राजेशाही की लोकशाही, भांडवलशाही की कम्युनिझम, रशियन मॉडेल की अमेरिकन मॉडेल... यावर विचार करता येईल.

भारतीय चिंतनाच्या, प्रकृतिस्वभावाच्या आधारावर पन्नास वर्षापूर्वी पंडित दीनदया उपाध्याय यांनी एकात्म मानव दर्शनाचा विचार प्रस्तुत केला. त्याचे विविध आयाम कार्यकर्त्यांपुढे मांडले.

पंडितजींचे विचार त्यातील सार कायम ठेऊन सोप्या शब्दात मांडण्याची कल्पना आली. त्यांच्या जन्मशताब्दीचे व एकात्म मानव दर्शनाच्या सुवर्ण जयंतीचे निमित्त साधून हा ल्रेखन प्रपंच आहे.

No comments:

Post a Comment